नाशिक : (दिनेश पाठक) शहरातील गुन्हेशाखा युनिट क्र.१ च्या पथकाने सापळा रचत आंध्रप्रदेश व तामिळनाडूतील तीन जणांच्या टोळीकडून २ लाख ३८ हजार रूपये किमतीचे चोरीचे २२ मोबाईल हस्तगत केले. पंचवटीतील फ्लॅटमधून एकाचवेळी पाच मोबाइल चोरीस गेले हाेते. पोलिस या घटनेची उकल करीत असताना पुढच्या काही तासातच मोबाइल चाेरणारी मोठी टोळीच पोलिसांच्या हाती लागली.
शहरात मोबाइल चोरीचे वाढते प्रमाण पाहता पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी चोरट्यांच्या शोध घेण्याची सूचना केली हाेती.
त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले. बुधवारी (दि.५) सकाळी सात वाजेच्या सुमारास राजपाल कॉलनी, पंचवटी येथील तेजश्री अपार्टमेंटमधील एकाच फ्लॅटमधून ५५ हजाराचे पाच मोबाईल फोन चोरी झाले होते. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी शहरात आली असल्याची माहिती मिळाली. नंतर चोरट्यांनी आपला मुक्काम देवळाली गाव परिसरात हलविला.
टोळीतील तीन जण नाशिकरोड येथील वाघचौकात चोरलेले मोबाइल विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून इंद्रा डुमप्पा, रा. १-२३ बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि. चित्तुर (आंध्रप्रदेश) तसेच बालाजी सुब्रमणी, रा. ५०२. उदया राजपालम थोटागल जि त्रिपथुर (तामीळनाडू). दुर्गेश कृष्णमूर्ती रा. बोडीगुटला पाले, व्यंकटगिरी कोटा, (आंध्रप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २२ मोबाइल जप्त करण्यात आले आहे.