विजय मोरे नाशिकपोलीस आयुक्तालयात गतवर्षभरात ४० खुनांच्या घटना होत्या़ या खुनाच्या घटनांमध्ये बहुतांशी खून हे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्यामुळे याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही़ मात्र, यावर्षी साडेचार महिन्यांतच खुनाने बाविशी गाठली असून, निम्मे वर्ष सरण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी अजून बाकी आहे़ खुनाच्या २२ घटनांमध्ये १८ पुरुष, ३ महिला व एक सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे़ खुनाची सुरुवातच सराईत गुन्हेगार आव्हाड व गवळे यांच्यापासून झाली होती़ पोलिसांचा धाक व दरारा नसल्यामुळेच वाहन जळीत कांड, खून तसेच गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे़नाशिक शहरात जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ५, मार्च १, एप्रिल ६, तर मे महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत खुनाच्या ४ घटना घडल्या आहेत़ यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाच-सहा खुनांच्या घटना वगळता बाकीच्या सर्व घटना या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत़ किरकोळ स्वरूपाच्या कारणावरून या खुनाच्या घटना घडत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे केवळ खूनच नव्हे तर वाहन जळीत कांड, हाणामाऱ्या, घरफोडी, लुटालूट या घटनाही मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येते़‘पोलीस म्हणजे जादूची कांडी नव्हे’ असे वक्तव्य करणाऱ्या एका माजी पोलीस आयुक्तांच्या काळात शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याने शासनाने त्यांची तत्काळ उचलबांगडी केली़ त्यानंतर शहरात एका कडक शिस्तीच्या आयुक्तांची नियुक्ती झाल्याने काहीकाळ शांतता निर्माण झाली होती़ तसेच या आयुक्तांच्या कार्यकाळातच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये आपसात भांडणे, खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचे काम गुंडच करीत असल्याने या खुनाच्या घटनांबाबत सर्वसामान्य नागरिक व पोलीस या दोघांना कसलेही सोयरसूतक नव्हते़सिंहस्थातील बंदोबस्ताचे नियोजनामध्ये अडकलेल्या नवनियुक्त पोलीस आयुक्त जगन्नाथन यांना सुरुवातीला कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देणे शक्य झाले नाही़ तसेच त्यांच्या मितभाषी स्वभावाचा फायदाही पोलीस अधिकाऱ्यांनी अलगद उचलला़ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धाक राहिला नसल्याने कोम्बिंग, आॅलआउट या नवीन संकल्पनांही हळूहळू बारगळत गेल्या़ शहरात रस्त्यावर पोलीस दिसेनासे झाले असून, महिन्यातून केव्हातरी थातूरमातूर कारवाई करून अधिकारीही धन्यता मानत असल्याचे चित्र आहे़
साडेचार महिन्यांत शहरात 22 खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 11:59 PM