अझहर शेख, नाशिक : इस्लामी कालगणनेचा शेवटचा महिना जिलहिज्जा हा हज यात्रेसाठी ओळखला जातो. पाच धार्मिक मूलस्तंभापैकी एक असलेल्या पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबिया देशातील मक्का शहरात नाशिक जिल्ह्यातून २२०० हज यात्रेकरू पोहोचले आहेत. यामध्ये २० ते ३० वयोगटातील सहा युवती व दोन युवकांचाही समावेश आहे. यंदा एका यात्रेकरूला हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ३ लाख ३६ हजार ३३० रुपये इतका खर्च आला आहे.
शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे अनिवार्य असते. दरवर्षी सौदी अरेबियामधील मक्का-मदिना या दोन शहरांमध्ये ही तीर्थयात्रा पार पडते. जगाच्या काेनाकोपऱ्यातून मुस्लिमबांधव याठिकाणी दाखल होतात. यावर्षी भारतासाठी १ लाख ७५ हजार हज यात्रेकरूंचा एकूण कोटा सौदी सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी राज्यासाठी १९ हजार ६२४ यात्रेकरूंचा कोटा मिळाला होता. नाशिक शहरातून ४००, तर मालेगावातून १८०० यात्रेकरू सौदीमध्ये दाखल झाले आहेत. राज्यातून २६ मे पासून सौदी विमानांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सौदी विमानांचे उड्डाण सुरू होते. अखेरचे उड्डाण ९ जून रोजी झाले. येत्या शुक्रवारपासून (दि. १४) हज यात्रेला मक्का शहरात प्रारंभ होणार आहे. रविवारी (दि. १६) तेथे सर्व यात्रेकरू बकरी ईद (ईद-उल-अज्हा) चे सामूहिक नमाजपठण करतील. नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि. १७) बकरी ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे.
--इन्फो--
पाच महिन्यांपासून सुरू होती तयारी
हज यात्रेची तयारी जानेवारी महिन्यापासून सुरू झाली होती. हज कमिटी ऑफ इंडियाद्वारे नाशिकमध्ये ‘खादिमुल हुज्जाज’ म्हणून हज यात्रेकरूंना मोईन खान, हामीद खान, नईम मुल्ला, मोबीन खतीब, गुलाम दस्तगीर, इम्तियाज शेख हे सेवा देत होते. हज यात्रेसाठी इच्छुकांकडून अर्ज भरून घेणे, अर्जांची पडताळणी करणे, भाग्यवंत सोडत काढणे, यानंतर अंतिम यादीत निवड झालेल्या हज यात्रेकरूंकडून रक्कम जमा करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर राबविणे, लसीकरणाची व्यवस्था करणे, भारतीय रुपयांच्या मोबदलत्यात ‘रियाल’ हे सौदीचे चलन करून देणे, आदी बाबी या सर्व हज यात्रींच्या सेवेकऱ्यांच्या चमूने विना अडथळा पार पाडल्या. यामुळे यात्रेकरूंची होणारी गैरसोय टळली.