नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजेवर नाचताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
नितीन रणशिंगे (वय, २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन हा आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजेवर नाचत असताना अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीनच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.