नाशिक : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाने दोन हजारांचा आकडा ओलांडत २३६० पर्यंत मजल मारली असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल १० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या २२२० वर पोहोचली आहे.
गत ऑक्टोबर महिन्यानंतर पुन्हा दोन आकडी बळी गाठला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल २३६० बाधित रुग्ण तर ६७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ४, मालेगावला २, ग्रामीणला ३ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण १० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२२० वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर आणि गत पाच दिवसांमध्ये सातत्याने दोन हजारांवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला आता कठोर कारवाईशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
इन्फाे
नाशिक मनपा क्षेत्रात १२८१
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात रविवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १२८१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरातदेखील सातत्याने हजार, बाराशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी सापडण्याचा प्रकार प्रथमच घडून येत आहेे. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली असून ग्रामीण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण उपचारांसाठी नाशिकला येत आहेत.
इन्फो
पाच दिवसात ११ हजार ८१८ बाधित
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरुच असून सलग पाच दिवसात दोन हजारांवर रुग्ण वाढल्याने अवघ्या पाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत ११ हजार ८१८ रुग्णांची वाढ झाल्याने यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणादेखील अपुरी पडू लागली आहे. त्यामुळेच कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरु केले आहेत.