यावर्षी मार्च महिन्यापासूनच कोविड-१९ अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शासकीय कामकाजही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली होती, तरीदेखील या वर्षभरात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव अशा पाच जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रात एकूण १०० लोकसेवक रंगेहाथ लाच घेताना पकडले गेले. यामध्ये सर्वाधिक पोलीस आणि महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये वर्षभरात नऊ लाचखोर पोलिसांसह महसूल खात्याच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच अहमदनगरमध्येसुद्धा आठ पोलीस आणि नऊ महसूल कर्मचारी लाचेची रक्कम घेताना सापळ्यात अडकले. नाशिक परिक्षेत्रात एकूण २६ लाचखोर महसूल कर्मचारी आणि २४ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
--इन्फो--
१०४ गुन्ह्यांपैकी ४८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित
नाशिक परिक्षेत्रात चालू वर्षभरात शंभर सापळे यशस्वी ठरले तर, अपसंपदेप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या विभागात एकूण १०४ गुन्हे यावर्षी दाखल झाले. लॉकडाऊन शिथिल होताच शासकीय कार्यालयांमधील कामकाजाची गाडी रुळावर आली आणि काही लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसून आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक परिक्षेत्रात दाखल झालेल्या १०४ गुन्ह्यांपैकी ४८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे तर १२ गुन्ह्यांत विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
---इन्फो--
परिक्षेत्रनिहाय यशस्वी सापळे
मुंबई- २१, पुणे- १३४, ठाणे- ४३, औरंगाबाद- ८८,नाशिक- १००, नागपूर- ७१, अमरावती- ७८, नांदेड- ६७
--कोट--
यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर झालेला दिसतो, तरीही शंभर सापळे यशस्वी झाले. यावर्षी नाशिक युनिटने कृषी खात्यातील वर्ग- १, प्रदूषण मंडळातील वर्ग- १ व २, गृह खात्याशी संबंधित वर्ग- १च्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. कोविड-१९चे आव्हान पेलत विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. परिक्षेत्रातील एकूण १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधाही झाली होती. राज्यात नाशिकचा भ्रष्टाचारविरोधी कारवाईत दुसरा क्रमांक लागतो.
-सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक