नाशिक : शहर पोलीस मुख्यालयातील गैरव्यवहाराचे एकेक प्रकरण बाहेर येत असून, मुख्यालयातील एका पोलीस हवालदाराने पोलीस आयुक्तालयाच्या विविध आस्थापना विभागांचे वीज भरण्यामध्ये २४ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ संशयित पोलीस हवालदाराचे नाव हिंमत रघुनाथ निकम (रा़ पोलीस मुख्यालय) असे असून, त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुख्य लिपिक कृष्णा काशीनाथ अहिरे (रा. शिवाजीनगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस आयुक्तालयांतर्गत अनेक आस्थापना विभाग आहेत़ या आस्थापना विभागांना येणारे विजेचे बिल वीज वितरण कार्यालयात भरण्याचे काम पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार हिंमत निकम यांच्याकडे होते़ संशयित निकम याने ९ मार्च २०१४ ते २ सप्टेंबर २०१५ तसेच जून २०१६ या कालावधीत वीज बिल भरण्याचे काम केले़ पोलीस आयुक्तालयातील विविध आस्थापना विभागास येणाऱ्या मासिक वीज बिलामध्ये संशयित निकम याने अफरातफर तसेच बिलभरणा पावत्यांमध्ये खाडाखोड केली़ वीज कंपनीने पाठविलेल्या बिलातील रकमेपैकी कमी रकमेचा भरणा करून मिळणाऱ्या पावत्यांवर संपूर्ण बिलाची रक्कम दाखवली, त्यासाठी पावत्यांवर खाडाखोड करून भरणा केल्याचे दाखविले़ (प्रतिनिधी)
वीज बिलात २४ लाखांचा अपहार
By admin | Published: February 06, 2017 12:32 AM