नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या २४ पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. भाजपाच्या बंडखोरांनी १९ प्रभागात पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण झालेला असताना पक्षाकडून या बंडखोरांच्या बाबतीत कोणताच निर्णय होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने जवळपास सर्वच मूळ भाजपाचेच सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. अनेक वर्षे पक्षात काम केल्यावरही महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही, उलट ऐनवेळी पक्षात आलेल्यांना मानाचे पान देण्यात आल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी बंडखोरी केली होती. अर्थातच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या बंडखोरांनी पक्ष नेत्यांवर आर्थिक देव-घेवीचे आरोप केले त्याचबरोबर पक्षाने अन्याय केल्याची भावनाही व्यक्त केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर बंडखोरांची कृती पक्ष विरोधी कारवाया ठरविण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे सानप यांनी पत्रकात म्हटले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, शहर सरचिटणीस, शहर चिटणीस, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष, व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख, आदिवासी आघाडीचे शहराध्यक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)हकालपट्टी झालेले बंडखोरश्रीमती मंदाबाई बबन ढिकले (प्रभाग १८), सुरेश अण्णाजी पाटील (१२), प्रकाश दीक्षित (१२), दीपाली मिलिंद भूमकर (१३), मिलिंद भूमकर (१३), डॉ. वैशाली काळे (१४), मधुकर हिंगमिरे (७), संदीप मंडलेचा, सोनल मंडलेचा (२९), जयश्री पद्माकर घोडके, चारुहास पद्माकर घोडके, लता संजय करिपुरे, संजय करिपुरे (२३), समीर पद्माकर गायधनी (१३), रुक्मिणी धोंडीराम कर्डक (४), दीपक शेवाळे, विनायक बाळासाहेब बर्वे (९), श्रीमती अलका रामचंद्र गांगुर्डे (१४), सविता गायकवाड (१६), मीरा गोसावी (१७), विकास पगारे (२०), सरला महेंद्र अहिरे (२१), राजेंद्र मंडलिक (२२) यांचा समावेश आहे.
भाजपाच्या २४ बंडखोरांची हकालपट्टी
By admin | Published: February 18, 2017 12:12 AM