जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी नवीन उच्चांक स्थापित करत पाच हजारांनजीक मजल मारली. त्यात नाशिक मनपामध्ये २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १८५ व जिल्हाबाह्य १५४ रुग्ण बाधित आहेत.जिल्ह्यात सोमवारी तब्बल ४,९१८ बाधित रुग्ण तर १५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ८, ग्रामीणला १२ , मालेगावला ४ तर जिल्हाबाह्य १ असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,३०८ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्यानंतर प्रारंभी तीन हजार तर शुक्रवारी बाधित संख्येने चार हजारापर्यंत मजल मारल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा बाधित संख्येत हजाराची भर पडल्याने बाधितांचा आकडा ५ हजारांनजीक पोहोचला आहे. चार दिवसांपासून बाधित संख्येने त्यापेक्षाही खूप मोठ्या उड्या मारल्याने जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यात प्रथमच नाशिकपेक्षा अधिक
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकाच दिवसात प्रथमच शहरातील बाधितांपेक्षा मोठी मजल गाठल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव शहराच्या बरोबरीनेच होऊ लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी नाशिक शहरात २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ इतके तीनशेहून अधिक बाधित प्रथमच आढळले आहेत.
इन्फो
प्रलंबित अहवाल सहा हजारांनजीक
जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी ही संख्या ५ हजार ९१९ वर पोहोचली आहे. बाधितांच्या आकड्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि अहवाल मिळण्यास मर्यादा असल्याने प्रलंबित संख्या सातत्याने ६ हजारांनजीक पोहोचल्याने नवीन आठवड्यातही बाधित संख्या मोठीच राहण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
बळीतील वाढ चिंताजनक
कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दुपटीहून अधिक झाली आहे. कोरोनाबळी दहा आणि वीसवर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. त्यात आठवडाभरात १० नंतर १२ त्यानंतर १५ बळी गेल्यानंतर शुक्रवारी ९ वर आलेली बळींची संख्या दुपटीहून अधिक वाढून थेट २५ वर पोहोचल्याने बळींची वाढती संख्या हा नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत आहे.