नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उत्पन्नापेक्षा अधिक रकमेची धरलेली कामे अडचणीची ठरली आणि त्यामुळे पालिकेच्या तीन विभागांची वार्षिक तरतूद संपल्याने ठेकेदारांना बिलेच दिली जात नव्हती; परंतु त्यावर तोडगा काढण्यात आला असून, पाणीपुरवठा, बांधकाम आणि विद्युत विभागासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मनपाच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा, बांधकाम विभाग आणि विद्युत विभागासाठी आयुक्तांनी संभाव्य उत्पन्नाचा अंदाज गृहीत धरून तरतूद केली होती. स्थायी समितीने उत्पन्नात वाढ होईल असे गृहीत धरून या विभागांची तरतूद आणखीनच वाढविली. प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणतेही उत्पन्न वाढले नाह आणि कामांचा अतिरिक्त ताण असल्याने आयुक्तांनी केलेली तरतूदच संपली. त्यामुळे या तीन विभागांचे आणि अन्य विभागांत काम करणाऱ्या ठेकेदारांची देयके थकल्याने आर्थिक पेच निर्माण झाला होता. सुमारे १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. नवीन आर्थिक तरतूद नसल्याने ठेकेदार पालिकेत तगादा लावत होते. मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्याकडे गेल्यावर ते ठेकेदारांना आयुक्तांकडे पाठवतात, तर आयुक्त सोनाली पोंक्षे या त्यांना परत लेखाधिकाऱ्यांकडे पाठवित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी काही त्रुटी काढून त्याबाबत लेखाधिकाऱ्यांना विचारणा केली होती, तर लेखाधिकाऱ्यांनी तीन विभागांसाठी लेखाशीर्षातील तरतूद संपल्याने आयुक्तांकडे वाढीव तरतुदीसाठी प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले होते. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने रस्ते बांधकामासाठंी २० कोटी, जलदाय आणि पथदीपांसाठी दोन कोटी, तर पाणीपुरवठा विभागासाठी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. (प्रतिनिधी)
ठेकेदारांसाठी वाढविली २५ कोटींची तरतूद
By admin | Published: October 18, 2014 12:50 AM