सिडको : भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मुळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावाचे भूमिपुत्र होते. सध्या मागील काही वर्षांपासून नाशिकमधील अंबड येथे ते कुटुंबासमवेत वास्तव्यास होते.
अंबड गावातील डीजीपीनगर-२ जवळील कंम्फर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे हे सैन्यदलात नोकरीवर होते. मंगळवारी त्यांच्या पत्नी सीमा सोनवणे यांना सैन्यदलाच्या कार्यालयातून फोन आला आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून ‘तुमचे पती एका अपघातात शहीद झाले आहेत’ असे सांगण्यात आले अन् त्यांच्यावर आभाळ फाटले. सुरुवातीला त्यांचा या निरोपावर विश्वासच बसत न्हवता, कारण मंगळवारी सकाळीच गणेश यांनी आपल्या पत्नी, मुलींशी फोनवरुन संवाद साधला होता, सर्वांची खुशहाली विचारली होती तसेच दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारासही त्यांनी फोन केला होता. त्यावेळेस पत्नी सीमा ह्या घरकामात व्यस्त असल्याने लहान मुलगी हर्षदासोबत त्यांनी गप्पा मारल्या. अभ्यास कसा सुरु आहे, याबाबत विचारपुस केली अन् सायंकाळी थेट अपघात झाला आणि त्यामध्ये गणेश हे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याचे माहिती फोनवरुन मिळाल्याने सोनवणे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. गणेश यांच्या पश्चात आई सिंधुबाई, पत्नी सीमा, मुली प्रांजल व हर्षदा असा परिवार आहे. दोन्ही मुली प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पार्थिवावर पातोंडा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
--इन्फो--
सोनवणे कुटुंबियांचा आधार हरपला
जवान गणेश सोनवणे यांच्या दोन्ही बंधुंचे काही वर्षांपुर्वी दुर्दैवी निधन झाले होते. यामुळे गणेश यांचा एकमेव आधार या कुटुंबाला होता.ऑक्टोबरअखेरीस ते सैन्यदलातून निवृत्त होणार म्हणून कुटुंबिय आनंदात होते आणि त्यांची घरी येण्याची वाट बघत होते; मात्र काळाने गणेश यांना त्यांच्यापासून कायमचेच हिरावून नेले आणि या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ते मागील गेल्या जून महिन्यात घरी सुटीवर आले होते, हे सांगताना पत्नी सीमा यांना अश्रु अनावर झाले होते, तसेच त्यांच्या दोन्ही मुलींचा अश्रूंचा बांध फुटला. सोसायटीमधील रहिवाशांनी सोनवणे यांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.