नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातीलपाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६३३ गावांमधील साडेतीन लाख लोकसंख्येसाठी १६१ टॅँकरने तहान भागविली जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आता प्रशासनाकडे पाण्याचे गाºहाणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनांनीही पुढे येण्यास नकार दिला आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा व येवला या सात तालुक्यांमध्ये तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्च अखेर हेच प्रमाण ४४ टक्के इतके होते.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २६ टक्के तर समूहात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, भोजापूरमध्ये तीन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता सात तालुक्यांतील १४९ वाडे व ४८४ गावे अशा ६३३ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने १६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ७४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात टॅँकरच्या संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येला पाण्याची गरज असून, धरणातील साठ्याचा विचार करता येणाºया तीन महिन्यांसाठी पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.तालुकानिहाय टॅँकरबागलाण-२७, चांदवड-३, देवळा-७, मालेगाव-३०, नांदगाव-२२, सिन्नर-४२, येवला तालुक्याला ३० टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:06 AM