नाशिक : शहरात अत्यंत वेगाने कोरोना संसर्ग पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरातील खासगी लसीकरण केंद्रांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या १८ खासगी हॉस्पिटल्ससह शुक्रवारी ७ नवीन खासगी हॉस्पिटल्सचा समावेश लसीकरणासाठीच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे महानगरातील लसीकरणासाठीच्या खासगी केंद्रांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.
करोना संसर्गात नाशिक राज्यात अव्वल ठरु लागल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यातच करण्यात आला होता. त्यानुसार एकूण २४ लसीकरण केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील ही ७ केंद्र शुक्रवारपासून सुरु करण्यात आला आहे. शासनाने नाशिकमध्ये कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लशी उपलब्ध केल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही लस खासगी रुग्णालयांमध्ये दिली जात असून तर मनपा रुग्णालयांमध्ये कोव्हिशील्ड लस उपलब्ध केली आहे.महापालिका क्षेत्रात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयांबरोबरच एकूण २७ ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले हाेते. मात्र, त्यातही काही वेळा लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस साठा संपुष्टात आल्याने परत जावे लागले होते. त्यामुळे मनपाच्या वतीने दीड लाख लसींचे डोस मागवले आहेत. लसीकरण केंद्रांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊनच लवकरात लवकर लसीकरण केंद्र वाढवण्याच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे.