नाशिक : मनसेच्या काळात शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी १९२ कोटी रुपये अद्याप खर्ची पडत असताना आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ते विकासासाठी सुमारे २५० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. डिसेंबरअखेर सदर प्रस्तावांबाबत निविदाप्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, फेबु्रवारी-मार्च २०१८ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.सन २०१५-१६ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे झाली. त्यात बाह्य रिंगरोड साकारले गेले. मात्र, कॉलनीरोडसह शहरातील मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे, मागील पंचवार्षिक काळात महापालिकेतील सत्ताधारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कॉलनीरोडसह अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश तत्कालीन महापौरांना दिले होते. त्यानुसार, १९२ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. अद्यापही रस्त्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेत सत्तापालट होऊन भाजपा आरूढ झाली.७० टक्के नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. त्यामुळे प्रभागातील कामांबाबत नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यासाठीच भाजपाने सुमारे २५० कोटी रुपयांचा रस्ते विकासासाठी प्रस्ताव तयार केला असून, शहरातील सुमारे २०० कि.मी. रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ज्या रस्त्यांना पाच वर्षांहून अधिक काळ झालेला असेल आणि रस्त्याची दुरवस्था झाली असेल तर अशा रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने घेतली जाणार असून, गरजेनुसार, रस्त्याचे डांबरीकरण, कॉँक्रिटीकरण, अस्तरीकरण केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता पवार यांनी दिली.
रस्ते विकासासाठी २५० कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:41 AM