लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: काही महिन्यांपासून रडारवर असलेल्या नाशिकच्या बिल्डर्सपैकी आणखी एका बिल्डरकडे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल २६ कोटींची रोकड तसेच सुमारे ९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने खळबळ उडाली. संबंधित व्यावसायिक हा अनेक व्यावसायिकांचा भागीदार आणि फायनान्सर असल्याने यानिमित्ताने अन्य अनेक बांधकाम व्यावसायिक रडारवर असून, त्यांची चौकशीदेखील होणार आहे.
ज्या दिवशी या बांधकाम व्यावसायिकाच्या घर, कार्यालय आणि सराफा पेढीवर छापा पडला, त्याच दिवशी याच बिल्डर्सशी संबंधित एक बांधकाम व्यावसायिक आणि गंगापूर रोडवरील एका डॉक्टरकडेही आयकर पथकाने चौकशी केली. नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी शरणपूर रोडवरील सुराणा ज्वेलर्स, राका कॉलनीतील सुराणा यांचा बंगला आणि त्यांचे महालक्ष्मी बिल्डर्स या फर्मचे कार्यालय अशा एकाच ठिकाणी छापे घातले. छाप्यात सुराणा यांच्या घरात रोकड सापडत होतीच. मात्र, काही अनुभवी आयकर अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी भिंतीची तपासणी केली. फर्निचर तोडताच नोटांच्या राशी असल्याचे आढळले. या बिल्डर्सच्या कर्मचाऱ्यांच्या घरातूनही राेकड जप्त केली. पथकाने लॅपटॉप पेनड्राइव्हसारखे साहित्य जप्त केले.
जमिनी खरेदी करताना रोखीत व्यवहार झाल्याची शक्यतासंबंधित बिल्डर्सचा सुवर्णदालन हा साधा व्यवसाय असला तरी जमीन आणि गृहनिर्माण व्यवसाय मोठा होता असे सांगितले जाते. जमिनी खरेदी करताना रोखीत व्यवहार झाल्याची शक्यता आयकर विभागाने वर्तविली. त्यादृष्टीने प्लॉटची खरेदी-विक्रीची देखील चौकशी करण्यात आली.
४५ अधिकारी, ३० तास चाैकशी नोटा मोजायला लागले १४ तास
- आयकर खात्याने निवडणूक काळात टाकलेल्या छाप्यांपैकी हा सर्वांत मोठा छापा होता. त्यात नाशिकबरोबरच नागपूर, जळगाव येथील सुमारे ४५ अधिकारी सहभागी झाले हेाते. बिल्डरचे घर, दुकान, फर्मचे ऑफिस, काही कर्मचाऱ्यांची घरे आणि अन्य काही बिल्डर्स आणि गंगापूर रोडवरील डॉक्टर अशा अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
- सुमारे ३० तास सलग चौकशी करण्यात आली; परंतु घरी सापडलेल्या २६ कोटी रुपयांची रक्कम बघून अधिकारी अवाक् झाले. अनेक बॅगा आणि ट्रॅव्हलर्स बॅगमध्ये रक्कम अधिकाऱ्यांनी जमा केली आणि शरणपासून जवळच सीबीएस येथे असलेल्या स्टेट बँकेत रोकड नेण्यासाठी सात मोटारी लागल्या. बँकेत नोटा मोजण्यासाठी १४ तास लागले.
- नाशिकमध्ये याआधी सुमारे पाच ते सहा बड्या बिल्डर्सवर असेच छापे पडले होते. त्यावेळी अडीच हजार कोटींचे व्यवहार सापडले हेाते. त्याच्या चाैकशीचे कवित्व अजूनही सुरूच आहे. त्यानंंतर आयकर खात्याचे नाशिककडे लक्ष गेलेे.