नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ८ हजार ४०० कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत २६०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, निवडणूक कर्मचाऱ्यांची रविवारी (दि. १२) दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येऊन प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे आतापर्यंत २६०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले आहेत. मतदानाच्या पाच दिवस अगोदर कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावे लागणार आहेत. त्यानंतर प्राप्त अर्जांनुसार त्या-त्या प्रभागातील मतपत्रिकांची छपाई करून संबंधित मतदार कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्त असलेल्या ठिकाणीच मतदान करत मतपत्रिका बंदिस्त पाकिटात जमा करायची आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी दुसरी कार्यशाळा सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम, कालिदास कलामंदिर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत त्या-त्या विभागातील निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले, तसेच कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचेही वाटप करण्यात आले. ईव्हीएममार्फत होणाऱ्या मतदान प्रक्रियेचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)
टपाली मतदानासाठी २६०० अर्ज
By admin | Published: February 13, 2017 12:37 AM