नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रूग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जाहीर केला असून, महाविद्यालयासाठी ४४८, तर रुग्णालयासाठी ९८६ पदांच्या निर्मितीसह पदभरतीला शासनाने मंजुरी दिली असून, महाविद्यालय व रुग्णालय बांधकामासाठी सुमारे २६३.११ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित शासकीय, निमशासकीय तसेच खासगी विनाअनुदानित संस्थांद्वारे विविध आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम राबविण्यात येतात. मात्र, अद्याप विद्यापीठाची स्वत:ची पदवी आणि पदव्युत्तर संस्था स्थापन होऊ शकली नव्हती. ही उणीव आता भरून निघणार असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन होणार असून, ‘महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ असे या संस्थेचे नामकरण करण्यात आले आहे. महाविद्यालय दैनंदिन परिचालन व व्यवस्थापन यासाठी स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत राहणार असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक हे सर्वसाधारण पर्यवेक्षण, व्यवस्थापन व नियंत्रण करणारी यंत्रणा असणार आहे. दरम्यान, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक असलेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास तात्पुरत्या स्वरूपात निःशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
इन्फो-
६२७.६२ कोटींचा अंदाजित खर्च
महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रुपये ६२७.६२ कोटी खर्च अपेक्षित आहे. महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामासाठी २६३.११ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली असून, यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इन्फो-२
विद्यापीठास पद भरतीस मान्यता
उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेची अट शिथील करून या महाविद्यालयासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत शासन मान्यतेने आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि विद्यापीठास पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी ४४८, तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
इन्फो-
१५ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीची ६४ विद्यार्थी प्रवेशक्षमता
महाविद्यालयात १५ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची ६४ विद्यार्थी प्रवेशक्षमता असणार आहे. यात औषधशास्त्र, शल्य चिकित्सा शास्त्र, भूल शास्त्र, रोगनिदान शास्त्र, स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुती शास्त्र यांना प्रत्येकी ६ जागा, बालरोग चिकित्सा शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, कान नाक घसा शास्त्र, नेत्रचिकित्सा, क्ष - किरण शास्त्र, त्वचारोग शास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्र यांना प्रत्येकी ४, जैवरसायन शास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, न्यायवैद्यक औषध शास्त्र यांना २ अशा एकूण ६४ जागा असणार आहेत.