सिन्नर : न्यायालयात रविवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासंदर्भात तडजोडीअंतर्गत ८२ लाख ४३ हजारांची रक्कम वसूल झाली. ४२ ग्रामपंचायतींमधील २६७२ व्यक्तींनी ही थकबाकी भरल्याने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे. यापूर्वी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या लोक-अदालतीत ११० ग्रामपंचायतींमध्ये एक कोटी २७ लाखांचा वसूल झाला होता. दरम्यान, अजूनही मोठ्या प्रमाणात करांचा महसूल थकीत असून, तो वसूल करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर आहे. मुख्य न्यायाधीश पी.सी. रामदिन, कनिष्ठ न्यायाधीश डी.एस. जाधव, न्यायाधीश व्ही. एस. वाघ, सिन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण गुरुळे, गटविकास अधिकारी रत्नाकरपगार, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, विस्तार अधिकारी, बी.के. बिन्नर, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गिरी यांच्यासह ग्रामसेवकांच्या उपस्थितीत थकीत करांच्या वसुलीसाठी रविवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ४२ ग्रामपंचायतींच्या २६७२ थकबाकीदारांनी करांचा भरणा केल्याने ग्रामपंचायतींच्याखात्यात बयापैकी महसूल जमा झाला आहे. त्यात माळेगाव ग्रामपंचायतीच्या ९३ प्रकरणात तब्बल ३८ लाख ६७ हजार आणि मुसळगाव ग्रामपंचायतीत ४९ प्रकरणात १० लाख ९३ हजारांची रक्कम वसूल झाली. सिन्नर न्यायालयाकरवी नोटिसा बजावल्या जात असल्याने वसुलात भर पडली आहे.
लोकअदालतीत २६७२ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:15 AM