येवला : येवला नगरपरिषदेच्या सन २०१६-१७ या वर्षाच्या २७ कोटी २८ लाख ७२ हजार ४२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. ३२ लाख १४ हजार शिलकी अंदाजपत्रक असून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व नागरिकांना प्रभावीपणे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर अर्थसंकल्पात सर्वसमावेशक तरतुदी करण्यात आल्या आहेत. एलईडी स्ट्रीट लाइट साहित्य व स्ट्रीट लाइट खांब खरेदीसाठी २५ लाख, गटार बांधकाम व दुरु स्तीसाठी २० लाख, जंतुनाशके खरेदीसाठी १० लाख, पाणीपुरवठा देखभाल व दुरु स्ती १५ लाख, नवीन क्लोरीनेटर खरेदीसाठी ५ लाख, फ्लोमीटर बसविण्यासाठी १० लाख रु पये यांच्यासह महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे होते. सभेच्या कामकाजाला सुरु वात करण्यापूर्वी माजी नगराध्यक्ष कै. प्रभाकर कासार, प्रतिष्ठित व्यापारी पुखराज पारख, तरु ण व्यापारी हाबडे, माईनकर, लान्सनायक हनुमंताप्पा, सियाचीनमधील वीरमरण आलेले सैनिक, नगरपरिषद कर्मचारी दिगंबर बोडके, सुशील उपासनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी विशेष सभेमध्ये अंदाजपत्रकाबाबत माहिती दिली व नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा होऊन त्यावर विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्याबाबत प्रशासनाकडून त्वरित अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. लेखापाल सुभाष निकम, राजेश दाणेज, बंडू खानापुरे यांनी अंदाजपत्रक तयार केले असून, त्याचे वाचन सभागृहात करण्यात आले. यावेळी सभेला एकूण २२ सदस्य यांच्यासह सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
येवला नगरपालिकेचा २७ कोटींचा अर्थसंकल्प
By admin | Published: February 27, 2016 10:09 PM