नाशिक : महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागून असणार आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील १६३ मंगल कार्यालये व लॉन्स यांना अनधिकृत बांधकाम व विनापरवाना वाणिज्य वापर केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर कारवाईची तयारी सुरू असतानाच आता नगररचना विभागाने इमारतीतील तळघरांचा अनधिकृत वापर करणाºया व्यावसायिकांची यादी तयार करत कारवाईसाठी ती अतिक्रमण विभागाकडे पाठविली आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात २८१ ठिकाणी तळघरांचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात १०४ ठिकाणी गुदामे असून, २५ ठिकाणी हॉटेल थाटण्यात आली आहेत. याशिवाय १०५ ठिकाणी विविध प्रकारची दुकाने सुरू आहेत, तर ४७ ठिकाणी अन्य व्यवसाय चालतात. पंचवटी विभागात सर्वाधिक ९९ ठिकाणी तळघरांचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर महासभेत भाषण करताना तळघरातील अतिक्रमणांसह टेरेसवरील अनधिकृत वापरावर चाप लावण्याचे सूतोवाच केले होते. तळघरातील अनधिकृत वापराबद्दलची कारवाई महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या इमारतींपासूनच करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाकडे यादी रवाना केल्यानंतर आयुक्तांच्या केलेल्या भाषणानुसार, कधी आणि कुठून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू होते, याकडे लक्ष लागून असणार आहे.टेरेसचा अनधिकृत वापरतळघरातील अनधिकृत वापराबरोबरच महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारतीच्या टेरेसवर थाटलेल्या अनधिकृत वापराबाबतही सर्वेक्षण करत यादी तयार केलेली आहे. त्यात २१ ठिकाणी टेरेसवर हॉटेल, तर १२ ठिकाणी गुदामे थाटण्यात आली असून, नऊ ठिकाणी अन्य वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतही महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही हॉटेलचालकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले असले तरी बºयाच जणांनी आपले बांधकाम कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
२८१ तळघरांचा अनधिकृत वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:23 AM