नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन हजारांच्या आसपासचा आकडा कायम राखला असून साेमवारी (दि. २८) एकूण २८४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, शनिवारनंतर पुन्हा २५ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २३५१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १६८१ तर नाशिक ग्रामीणला ९८१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १७५ व जिल्हाबाह्य ३३ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ५, ग्रामीणला १७ तर मालेगावला ३ असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारांवर राहिल्यानंतर प्रारंभी तीन हजार तर शुक्रवारी बाधित संख्येने चार हजारांपर्यंत मजल मारल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा बाधित संख्येत हजाराची भर पडल्याने बाधितांचा आकडा शनिवारी ५ हजारांनजीक पोहोचला होता. जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चा सुरु झाली आहे.
जिल्ह्यात प्रथमच नाशिकपेक्षा अधिक
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकाच दिवसात प्रथमच शहरातील बाधितांपेक्षा मोठी मजल गाठल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव शहराच्या बरोबरीनेच होऊ लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी नाशिक शहरात २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ इतके तीनशेहून अधिक बाधित प्रथमच आढळले आहेत.
इन्फो
प्रलंबित अहवाल पाच हजारांनजीक
जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात गत दोन आठवड्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून सोमवारी ही संख्या ४ हजार ९१० वर पोहोचली आहे.
इन्फो
कोरोनामुक्ततेचा दर ८५ टक्क्यांखाली
जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर गत महिन्यात ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता; मात्र मार्च महिन्याच्या प्रारंभापासून त्यात घसरण होण्यास प्रारंभ झाला. सोमवारपर्यंत कोरोनामुक्ततेच्या दरात एकूण १३ टक्क्यांहून अधिक घट आली असून ते प्रमाण ८४.२३ वर आले आहे.
इन्फो
उपचारार्थी रुग्णसंख्या २५ हजारांवर
जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या २५ हजार १९० वर पोहोचली आहे. त्यात १५ हजार २३३ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ८१४८ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, मालेगाव मनपा क्षेत्रातील १५९५ तर जिल्हाबाह्य २१४ रुग्णांचा त्यात समावेश आहे.