नाशिक : उशिरा व अपु-या पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रूपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रूपयांची रक्कम शेतक-यांच्या अंतर्गंत भाऊबंदकीच्या वादामुळे पडून आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन झाले, परिणामी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत करून जून अखेर पीक पेरणी केलेल्या शेतक-याला पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसावे लागले. जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले असले तरी, जिल्ह्यातील काही विशिष्ट भागाकडे पावसाने वक्रदुष्टी कायम ठेवली. आॅगष्ट महिन्याच्या दुस-या सप्ताहात हजेरी लावलेल्या पावसाने थेट सप्टेंबरमध्येच पुन्हा आगमन केले. परिणामी खरीपाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, चांदवड, सिन्नर, नांदगाव, देवळा, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने दुष्काळ जाहीर करण्यापुर्वी केंद्रीय पथकामार्फत दौरा करून माहिती जाणून घेतली. त्यात खरीपाचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये शासनाने गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. शासनाने सरसकट संपुर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व राष्टÑीय आपत्ती निवारण व्यवस्थापनांतर्गंत दुष्काळी मदत जाहीर केली. यात जिल्ह्यातील पाच लाख, ४१ हजार २५७ शेतक-यांचे चार लाख, ८० हजार ६८५ हेक्टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झाले. शासनाने कोरडवाहू जमीन असलेल्या शेतक-याला साडेसहा हजार रूपये प्रति हेक्टरी, बागायती जमीन असलेल्यांना तेरा हजार रूपये व फळबागांना अठरा हजार रूपये आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार तीन टप्प्यामध्ये जिल्ह्याला २८७ कोटी ७३ लाख, ४७ हजार रूपये अनुदान देण्यात आले असून, ते दुष्काळी तालुक्यांना बाधित शेतक-यांच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात आले असून, तालुका पातळीवरून शेतक-यांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. परंतु ३४ कोटी, २६ लाख, २६ हजार रूपये विना वाटप पडून आहेत. त्यात काही शेतकरी शासनाची मदत मिळण्यापुर्वीच मयत झाले तर काही शेतकरी कुटूंबात न्यायालयात वाद सुरू आहेत. काहींचे बॅँक खात्याची माहिती नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.