येवला : जिल्ह्यात मालेगावपाठोपाठ येवल्यातही रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी टप्प्याटप्प्याने २९ रुग्ण औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी चार राहिली आहे. तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने प्रशासनासह येवलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.येवला येथील आरोग्य यंत्रणाच कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहर व तालुक्यातील ३२ बाधितरुग्णांपैकी तब्बल २९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आता तालुक्यात केवळ तीनच रुग्ण राहिले आहेत. या तिघा रुग्णांवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचाराला या रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून न आल्याने येवल्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यास प्रशासनाला यश आले आहे.२३ एप्रिलपासून येवला शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आणि ३२ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली होती. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येऊन २८ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज एका कोरोनामुक्त रुग्णाला येथील कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाभूळगाव येथील कोविड केअर सेंटर व निर्धारित कोविड आरोग्य केंद्रात सद्यस्थितीला एकही रुग्ण नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक शैलजा कुप्पास्वामी यांनी दिली आहे.दरम्यान, २९४ व्यक्तींना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगीतले.---------------------------------------------दाभाडी गाव शंभर टक्के कोरोनामुक्तशीवरोड : दाभाडी गावात पंधरा कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यांना गावाबाहेरच असलेल्या शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या रुग्णावर विविध सामाजिक संस्था तसेच मराठा महासंघाचे सदस्य व गावातील विविध पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील विविध डॉक्टरांनी रुगणांची विशेष काळजी घेतल्यामुळे पंधराही रुग्णांचे दुसऱ्यांदा घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आले, यामुळे सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली तसेच विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना खबरदारी घ्यायला सांगितले आहे. भविष्यात पुन्हा कोरोनाचा सामना करण्याची गरज पडू नये यासाठी ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
येवला तालुक्यात २९ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:17 PM