अल्पवयीन बालिकेच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या १० तारखेला शहर हादरून गेले होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या क्रूर गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सात संशयितांचा सहभाग पोलीस तपासात निष्पन्न झाला. यामध्ये चक्क एका महिलाही सहभागी असल्याचे पुढे आले. या संशयित महिलेने अल्पवयीन मुलीला एका खोलीत ढकलून देत बाहेरून दरवाजा बंद करून घेतला होता. तर उर्वरित सहा संशयितांनी तिला चाकूचा धाक दाखवून आपल्या वासनेचा बळी ठरविले. त्यांच्याविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत नियोजनबद्धरित्या कट रचून संशयितांनी हा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात उघड झाल्याने पाण्डेय यांनी या टोळीतील संशयित टोळीप्रमुख सुनील निंबाजी कोळे व त्याचे साथीदार संशयित आकाश राजेंद्र गायकवाड (२२, एकलहरा रोड), रवी ऊर्फ फॅन्ड्री संतोष कुऱ्हाडे (१९, रा. उपनगर), दीपक समाधान खरात (१९, रा. सिन्नरफाटा), सोमनाथ ऊर्फ सोम्या विजय खरात (१९, रा. देवळाली गाव), पूजा सुनील वाघ (२७, रा. अरिंगळे मळा) यांसह एक विधीसंघर्षित बालकाविरुद्ध मोक्काची कारवाई केली. त्यांचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी चौकशी करत मोक्कावर शिक्कामोर्तब केले. आतापर्यंत दोन टोळ्यांमधील एकूण २९ संशयितांविरुद्ध मोक्का कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात खटला पोलिसांकडून चालविला जाणार आहे.
---इन्फो--
उपनगरच्या खुनातील टोळीवरही मोक्का
उपनगर पोलीस ठाणे हद्दीत २०२० साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीतील २२ संशयित आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. हा प्रस्तावदेखील अपर पोलीस महसंचालकांकडून कायम ठेवण्यात आला. या टोळीतील संशयितांविरुद्ध पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आनंदवली येथे भूमाफियांच्या टोळीकडून नियोजनबद्धरित्या एका वृद्धाचा खून करण्यात आला होता. या खुनात पोलिसांच्या अटकेत असलेल्या टोळीतील ११ संशयितांविरुद्ध मोक्का न्यायालयाने शिक्कामार्तब करत पोलिसांना ४५ दिवसांत मोक्काचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
--इन्फो---
गुन्हेगारांना आयुक्तांचा ‘चेकमेट’
नाशिक शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सराईत गुन्हेगारांचा ‘हिस्ट्री’ काढून त्यांची वर्तणूक तपासून गुन्ह्यांचे स्वरूप बघता टोळ्यांना मोक्कांतर्गत ‘चेकमेट’ केले आहे. मोक्काच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहेत. लवकरच उर्वरित मोक्काचे प्रस्ताव अपर पोालीस महसंचालकांच्या कार्यालयाकडे पाठविले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.