नाशिक : नाशिक विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराशी लढण्यासाठी राज्य सरकारने तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, त्याद्वारे विलगीकरण कक्ष, निवासी व्यवस्था आदींवर खर्च करण्याची मुभा जिल्हा प्रशासनास देण्यात आली आहे.राज्यात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कार्यकारी समितीने १६ मार्च रोजीच याबाबतचा निर्णय घेऊन प्रत्येक विभागाला पाच कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. या निधीतून कोरोना संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करणे, त्यांची तात्पुरती निवासव्यवस्था करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे, पोलीस, स्थानिक संस्था, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी साधनांचा खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे, त्यानुसार नाशिक विभागासाठी तीन कोटी रुपये प्राप्त झाले असून, विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी विभागातील चार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्येकी पन्नास लाख रुपये, तर नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच बाधित रुग्णांची संख्या पाहता त्यांच्यासाठी एक कोटी रुपये वर्ग केले आहेत.
नाशिक विभागात कोरोना लढ्यासाठी तीन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:33 PM