नाशिक : सिन्नरफाटा येथे संशयित वाहनांची तपासणी गुन्हे शाखा युनिट-२चे पथक करत असताना सिन्नरकडून शहरात येणाऱ्या एका बोलेरो जीपवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्या जीपचा पाठलाग सुरू करत पाथर्डीफाटा येथे जीप रोखली. जीपच्या सीटखाली विशेष तयार केलेल्या पत्र्याच्या एका खोक्यातून पोलिसांनी तब्बल ८६ किलो ८७८ ग्रॅम इतका सुमारे ८ लाख ६८ हजार ७८० रुपयांचा गांजा जप्त केला.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सिन्नरफाटा येथे गुन्हे शाखा युनिट-२चे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील आदींनी जीपचालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याकडे त्याने दुर्लक्ष करत त्याने बोलेरो जीप (एम.एच १७ बीएस ४७४७) थेट द्वारकेच्या दिशेने दामटविली. पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. उपनगर, आंबेडकरनगरमार्गे चालकाने जीप डावीकडे वळवून डीजीपीनगर-१, वडाळागावातून थेट पाथर्डीफाट्यापर्यंत नेली तेथे पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी जीपला घेरले. वाहनचालक जाकीर हुसेन मोहम्मद पठाण (४१,रा. आंध्र प्रदेश), राजू अशोक देसले (४३,रा. अयोध्यानगरी, हिरावाडी), माजीद अब्दुल लतीफ शेख (४२, रा. गोसावीवाडी, ना.रोड) यांना ताब्यात घेतले.आंतरराज्यीय तस्करीगांजासारख्या अमली पदार्थाची आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरट्या पद्धतीने जीपच्या आतील बाजूने विशेष जागा करून गांजा दडवून शहरात आणला जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले. पोलिसांनी पुन्हा बॉर्डरसिलिंग पॉइंटला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आंध्र प्रदेशमधून गांजा शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली तिघांनी पोलिसांना दिली.
पाथर्डीफाट्यावर ८७ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:09 AM