सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ३२१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये ३ लाख ७७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सिन्नर तहसील कार्यालयात एकूण २३ विभागांमध्ये निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता मतदारसंघात १३ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघाकरिता उपजिल्हाधिकारी ज्योती देवरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघात सिन्नर तालुक्यातील १२८, तर इगतपुरी तालुक्यातील ३२ गावे समाविष्ठ आहेत. सिन्नर तालुक्यातील २६३ व इगतपुरी तालुक्यातील ४६ अशी ३०९ मतदान केंद्र तसेच १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राची विभागणी करून तयार केलेले ११ सहाय्यक मतदान केंद्रे अशा एकूण ३२१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तालुक्यात १ लाख ५८ हजार ४९४ पुरुष, तर १ लाख ४१ हजार ५८३ महिला असे ३ लाख ७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सेना दलातील १ हजार ४४३ मतदार असून, त्यांना इटीपीबीएस प्रणालीद्वारे मतदान करणार येईल.
सिन्नर मतदारसंघात ३२१ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:10 AM