नाशिक : शहरातील तीन वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून, बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तब्बल ५५ पथके तयार करण्यात आली आहेत. या तिन्ही ठिकाणी तसेच मनपाने स्थलांतरितांसाठी उभारलेल्या निवारागृहात सोडियम हायपो-क्लोराइडची फवारणी करण्यात आली.नाशिक शहरात तीन कोरोना बाधित आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने बाधित रुग्णांच्या घरांच्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्याठिकाणी आरोग्य तपासणी आणि जंतुनाशक फवारणीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शनिवारी (दि.११) सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यात विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करीत असताना शहरात निश्चित केलेल्या तीन प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी केली जात असून, घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणीस गती दिली आहे.प्रतिबंधित क्षेत्रात फवारणी या प्रतिबंधित क्षेत्रात टँकरच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात येत आहे. प्रत्येक परिसरासाठी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, त्या माध्यमातून परिसरात ही औषध फवारणी केली जात आहे. तसेच या तीनही भागात कचरा संकलित करण्यासाठी तीन स्वतंत्र घंटागाड्या कार्यरत करण्यात आल्या असून, त्या घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जात आहे.
बाधित रुग्णांच्या निवास परिसरासाठी ५५ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:36 PM