जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरूच ठेवला असून, बुधवारी पुन्हा तीन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१९, नाशिक ग्रामीणमध्ये १४०४, मालेगाव मनपा क्षेत्रात ११६ तर जिल्हाबाह्य क्षेत्रामध्ये ६९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची संख्या तब्बल २६ हजार ६४३ वर पोहोचली आहे. शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसह जिल्ह्यात बाहेरून नाशिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काही गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील खूप खाली आले असून बुधवारी हे प्रमाण ८४ टक्क्यांवर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात २७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ५ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील, ११ नाशिक ग्रामीणमधील तर दोन जण जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील मृत्यू दर देखील १.३३ पर्यंत गेला आहे.
इन्फो
प्रलंबित पुन्हा पाच हजार पार
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीस लागलेले असताना प्राप्त होणाऱ्या अहवालांचे प्रमाण त्यापटीत वाढू शकलेले नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या नमुन्याचा तपासणी अहवाल मिळण्यास सातत्याने विलंब होत आहे. जिल्ह्यात बुधवारी प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा पाच हजार पार होऊन ५ हजार ३९९ वर पोहोचली आहे.