नाशिक : शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नाशिक जिल्ह्यात ३ हजार ६८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात देण्यात आलेली मुदत २४ डिसेंबरलाच संपली असली, तरी अजूनही १ हजार ८६९ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अद्याप संधी मिळालेली नाही, अशा विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. लॉटरी निघाल्यानंतर आतापर्यंत नाशिकसह राज्यभरात अवघे ५० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्या आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यभरात या वर्षी एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. राज्यभरातील १ लाख १५ हजार जागांसाठी दोन लाख ९२ हजार ३६३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरी निघाल्यानंतर, त्यात १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ५५७ जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आले होते. पाल्याच्या प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मात्र पालकांची शाळांकडून अडवणूक झाली. अनेक शाळांनी वेगवेगळे कारणे दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले. पडताळणी समितीकडे जाऊनही पालकांना प्रवेशाचा मार्ग सुकर झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्या आहेत.
इन्फो-१
आरटीईअंतर्गत शाळांची नोंदणी लाबणार?
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मागास आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहाय्य शाळांमध्ये मोफत शिक्षणाची तरतूद आहे. त्यासाठी दरवर्षी डिसेंबरपासूनच अशा शाळांची नोंदणी सुरू होते. मात्र, या वर्षी कोरोना व प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अजूनही १ हजार ८६९ जागा रिक्त असून, या जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याने पुढील शैक्षणिक वर्षातही शाळांची नोंदणी प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जवळपास ४४७ शाळांनी नोंदणी केली होती. मात्र, या वर्षी शाळांची नोंदणी कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्फो -२
जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची स्थिती
शाळांची संख्या : ४४७
आरटीई अंतर्गत जागा : ५,५५७
आलेले अर्ज : १७,६३०
लॉटरीत निवड : ५,३०७
एकूण प्रवेश : ३,६८२