लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्री दुकानांचे परवाने नूतनीकरणास मज्जाव केल्यामुळे बंद झालेल्या दुकानांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात झाली असून, तीस मद्यविक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तसे प्रस्ताव सादर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सुमारे ७० टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्याने त्याचा मद्याच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. महामार्गावरील दुकाने बंद करण्यात आल्याने शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अन्य दुकानांवर त्याचा ताण वाढला असून, तेथे होणारी गर्दी पाहता ज्यांचे यापूर्वी महामार्गावर मद्यविक्रीचे दुकान होते त्यांनी शहराच्या मध्यवस्तीत जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातील काही दुकानांचे स्थलांतर यापूर्वीच झाले असून, आणखी ३० मद्यविक्रेत्यांनी नवीन जागेत स्थलांतर करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मद्यविक्रीचा परवाना या दुकानदारांकडे असला तरी, नवीन दुकान सुरू करण्यासाठी ज्याप्रमाणे कागदोपत्री पूर्तता करावी लागते ती करणे त्यांना अनिवार्य असून, मुख्यत्वे करून ज्या जागेत दुकानाचे स्थलांतर करण्यात येणार आहे तेथील जागा मालकाची ना हरकत जशी गरजेची तसेच परिसरात शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांपासून दुकानाचे सुरक्षित अंतर राखले जाणे अपेक्षित आहे.
३० मद्यविक्रेत्यांची स्थलांतराची तयारी
By admin | Published: May 07, 2017 1:34 AM