नाशिक : गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचारी संपावर कायम असताना, महामंडळाकडून सातत्याने बसेस सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सात आगारांमधून काही बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. या आठवड्यात आणखी बसेस रस्त्यावर येतील, असा दावा महामंडळाच्या आधिकाऱ्यांनी केला आहे.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या महिनाभरापासून नाशिक विभागातील एस.टी. कर्मचारी संपावर आहेत. शासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही एकमत होऊ शकलेले नसल्याने बससेवा अजूनही ठप्पच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच, सात तारखेला कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार पगारही झाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दिवस भरले तेवढ्या प्रमाणात त्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले आहे. त्यानंतर लागलीच दुसऱ्यादिवशी काही चालक-वाहक कामावर परतल्याने जिल्ह्यात ३० बसेस सुरू करण्यात आल्याचा दावा महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड, सिन्नर, येवला, पिंपळगाव, नांदगाव, इगतपुरी आणि लासलगाव आगारांतील बसेस सुरू झाल्या आहेत. काही आगारांतून दोन ते तीन बसेस नाशिकपर्यंत धावल्याचे सांगण्यात आले. येवला येथून आलेल्या बसेसमधून ४१, पिंपळगाव येथून आलेल्या बसमध्ये ७, सिन्नर ४०, नांदगाव ३० , इगतपुरी ६, तर लासलागाव आगारातून सहा प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा केला जात आहे.
--इन्फो--
एस. टी. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या सात तारखेला वेतन जमा केले जाते. त्यानुसार गेल्या सात तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सुधारित वेतनश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाली असल्याने त्यानुसारच कर्मचाऱ्यांचे वेतन जमा झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काही प्रवासी कामावर परततील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे, तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने कर्मचारी बसेस काढणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. बोटावर मोजण्याइतपत एस.टी. कर्मचाऱ्यांनी गाड्या काढल्या आहेत, तर संपावरील कर्मचाऱ्यांची टक्केवारी ९८ टक्केपेक्षा अधिक आहे. असे असतानाही कर्मचारी कामावर परतण्याचा महामंडळाचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.