पंचवटी : पेठरोड-मखमलाबाद लिंकरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टी पाठीमागे असलेल्या पांजरापोळच्या जागेतील जवळपास २२ मोठ्या वृक्षांची बेकायदेशीरपणे पोकलॅन मशीनच्या सहाय्याने कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि.२९) पांजरापोळ जागेतील मोठे वृक्ष पोकलॅन मशीनच्या सहाय्याने तोडले जात असल्याची माहिती मनपा पंचवटी उद्यान विभागाचे प्रभारी राहुल खांदवे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकासह घटनास्थळी भेट दिली असता पांजरापोळच्या जागेत असलेले १२ ते १५ वर्षांपूर्वीची झाडे मुळापासून पोकलॅन मशीनच्या सहाय्याने काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. उद्यान विभागाचे पथक पोहचताच घटनास्थळी असलेला बांधकाम ठेकेदार, पोकलॅनचालक व पांजरापोळचे कर्मचारी पसार झाले. कत्तल केलेल्या वृक्षांची पाहणी केली असता सुबाभूळ, वॉटरब्रश, इलायती चिंच, रानभेंडी, काशिद आदी २२ मोठ्या वृक्षांसह अन्य छोटी ८ अशा ३० वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याचे स्पष्ट झाले. बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, पांजरापोळ संस्थेने बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याने उद्यान विभागाने कारवाई करू नये, यासाठी पांजरापोळ संस्थेने नगरसेवकांसह मनपाच्या अधिकाºयांना फोन करून उद्यान विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
पांजरापोळच्या जागेत ३० वृक्षांची बेकायदा कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:23 AM