----
पंचवटी : कोरोना कालावधीत रुग्णांना मदत करणारे अनेक हात पुढे येत असतांना समाजातील काही महाभाग कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करून काळाबाजार करणाऱ्या टोळीने चांगलाच हैदोस माजविला. विशेष म्हणजे या टोळीत रुग्ण सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच मेडिकल दुकानदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिनाभरात तब्बल दहा संशयित आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून जवळपास ३० इंजेक्शन जप्त केली आहेत. पंचवटी परिसरातील जुना आडगाव नाका या ठिकाणी एका रुग्णालयात रुग्णाला एक इंजेक्शन ३० हजार रुपये किमतीला विक्री करताना खुद्द एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तीन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली होती.
सदर घटनेला काही दिवस लोटत नाहीत तोच मखमलाबादला एका वॉर्डबॉयकडून गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तब्बल पाच
रेमडेसिविर जप्त केली होती. एका रुग्णालयात काम करणारा वॉर्डबॉय रुग्णांना घरी सलाईन लावण्याचे काम करायचा. त्यातूनच तो रुग्णांना घरी जाऊन इंजेक्शनदेखील द्यायचा. त्याने रुग्णांचे उरलेले इंजेक्शन चोरून स्वतःजवळ ठेवायचा व रुग्णांना काळ्या बाजारात विक्री करायचा.
गेल्या आठवड्यात आडगाव पोलिसांनी आडगाव शिवारात असलेल्या वाघ महाविद्यालयासमोर ५४ हजार रुपयात दोन रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करताना दोन नर्सला ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीअंती आणखी एक नर्स व मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुरुवातीला तीन नर्स व एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या अशा चौघांना बेड्या ठोकल्या होत्या
व त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केली होती. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असताना इंजेक्शन पुरवठा पालघर जिल्ह्यातील काहीजण करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एकाला नाशिकमधून, तर तिघांना वाडा येथून अटक करत त्यांच्याकडून २० रेमडेसिविर जप्त केले आहे. आडगाव पोलिसांनी केलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, काळाबाजार करणाऱ्या आणखीन काही संशयितांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.