नाशिक : शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्ह्यांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना अखेर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री मिशन ऑल आऊट मोहीम राबवत दिलासा दिला. या मोहिमेत पोलिसांनी एकाच वेळी तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यावर येत ३० सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच एकूण अवैधरीत्या दारुविक्री, जुगाराच्या ३६ अड्ड्यांवर छापे टाकले. या मोहिमेने गुन्हेगारांचे धाबे पुन्हा दणाणले आहे.
मिशन ऑल आऊट, रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन, लेट नाईट फिक्स नाकाबंदी, यासारख्या मोहिमा मागील वर्षभरापासून बंद झाल्या होत्या. यामुळे शहरात गुन्हेगारी फोफावली. खून, खुनाचा प्रयत्न, चाकूहल्ले, हाणामाऱ्या, घरफोड्या, जबरी लूट, वाहनचोरी यांसारख्या सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख उंचावला. नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६७ विविध प्रकारचे गुन्हे आयुक्तालयाच्या हद्दीत घडले. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लुटीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. खुनाच्या तब्बल पाच घटना अलिकडे घडल्याने शहर जणू गुन्हेगारांचा अड्डाच बनला की काय ? असा सवाल उपस्थित केला जात होता. गुन्हेगारांनी ‘खाकी’ ला आव्हान दिल्याचेही उघडपणे बोलले जात होते.
कोरोनाचा निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिककरांनी मंगळवारी (दि. १३) रात्री उशिरा चौकाचाैकांत पोलिसांची नाकाबंदी अनुभवली. नऊ वाजेच्या ठोक्यावर शहरातील भद्रकाली, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, इंदिरानगर, गंगापूर, सातपूर, उपनगर आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस रस्त्यावर उतरले. दोन्ही परिमंडळात पोलिसांकडून सर्व उपनगरांमध्ये महत्वाच्या चौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. संशयित दुचाकीचालक, चारचाकी चालकांना थांबवून पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचे यावेळी दिसून आले.
--इन्फो--
गावठी कट्टा, कोयते, तलवारी जप्त
शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११२ पोलीस अधिकारी व ७८६ अंमलदारांचा ताफा शहरातील रस्त्यांवर उतरला. ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारांची शोध मोहीम राबवण्यात आली. अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश असल्यामुळे अवैध मद्यसाठा वाहतूक, विक्री व साठा केल्याप्रकरणी २६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. अवैध जुगार प्रकरणी ७ व गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विरोधात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आहे. बेकायदेशीररीत्या बाळगलेली दहा शस्त्रे या कारवाईत जप्त करण्यात आली. वेगवेगळ्या परिसरांतून एक गावठी कट्टा व इतर धारदार ९ शस्त्रे यामध्ये कोयता, चॉपर, सुरा यांचा समावेश आहे. विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सुमारे तीस गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.