त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतकऱ्यांची ओरड असताना एका रात्रीत १५५ मि.मी. पावसाची नोंद करून त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडविली आहे.गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, रस्त्यावरून उंच असलेल्या गोदा स्लॅबवर कमरेएवढे पाणी होते. स्लॅबवर असलेली भाजी मंडई अन्य व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले.गावातील गोदावरी नीलगंगा, म्हातार ओहळ व गावा बाहेरून वाहणारी अहल्या नदी आदींमुळे सर्व प्रवाह तुडुंब भरून वाहत आहेत. गावातील लक्ष्मीनारायण चौक, कुशावर्त चौक, मेनरोड, तेली गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका अमृतकुंभ, धर्मशाळा आदी ठिकाणी गुडघाभर पाणी वाहत होते.यावर्षी पावसाळीकामे, गटारी, गंगापात्र स्वच्छ न केल्यामुळे या पावसात गोदापात्राचे पाणी वरती येऊन मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. अधूनमधून विश्रांती घेत पाऊस संपूर्ण तालुक्यात बरसत आहे.विशेष म्हणजे दोन दिवसांआड मिळणारे पाणी आता एक दिवसाआड सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसे पालिका रोजदेखील पाणी सोडू शकेल, पण आता येणारे पाणी गढूळ असेल तरी जनतेने पालिकेला समजून घ्यावे, असे आवाहन नगरसेवक स्वप्निल शेलार यांनी केले आहे.त्र्यंबकेश्वरला अव्याहतपणे पावसाच्या सरी कोसळत आहे; पण पुनर्वसू पावसाने मात्र कमाल केली आहे. डोंगरावरून वाहणारे धबधबे वेगात कोसळत आहे. या पावसामुळे तालुक्यात किरकोळ स्वरूपाच्या घटना घडल्या असून, एक-दोन ठिकाणी भिंतींची पडझड झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान, तालुक्यातील चौरापाडा येथील नदीच्या पुरात एक बैल वाहून गेला आहे. अद्याप बैलमालकाचे नाव कळाले नाही. सद्य परिस्थितीत तालुक्यात चांगलाच पाऊस सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३६ तासांत ३००मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:19 PM
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतकऱ्यांची ओरड असताना एका रात्रीत १५५ मि.मी. पावसाची नोंद करून त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडविली आहे.
ठळक मुद्दे शहरात घराघरांत पाणी; डोंगरावरून वाहू लागले धबधबे; पुरात गेला बैल वाहून