वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावे येत असून सुमारे ४० हजार लोकसंख्या आहे. १० मार्चपासून लसीकरणास प्रारंभ झाला. सुरुवातीला पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक यांच्यासह फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत वावी प्राथमिक आरोग्य केंद्राने वावी, भोकणी, पांगरी, पाथरे, मऱ्हळ बुद्रूक, मऱ्हळ खुर्द, मीठसागरे, घोटेवाडी, फुलेनगर, पिंपरवाडी, मीरगाव या गावांना लसीकरणाची शिबिरे घेतली आहेत. सुमारे ३ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) यांनी दिली.
वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वावी, मिठसागरे, फुलेनगर, दुसंगवाडी, कहांडळवाडी, मलढोण, घोटेवाडी, वल्हेवाडी, सायाळे, पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ, मीरगाव, पिंपरवाडी, पांगरी बुद्रूक, पांगरी खुर्द, भोकणी, मऱ्हळ बुद्रूक, मऱ्हळ खुर्द, सुरेगाव, गुलापूर व निऱ्हाळे ही २३ गावे येतात. या सर्व गावांना लसीकरण करण्यासाठी पुरवठा कमी प्रमाणात होत असून अनेकवेळा लसीकरण शिबिराला मोठी गर्दी होत असल्याने अनेकांना माघारी जावे लागत आहे. अनेकवेळा गर्दीमुळे भांडणाचे प्रसंग ओढावत आहेत. त्यात वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.
इन्फो...
औषधनिर्माण अधिकारी नसल्याने कोणीही देते औषधे
वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधनिर्माण अधिकाऱ्याची जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या गोळ्या-औषधे देण्याचे काम आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक तर वेळप्रसंगी शिपायालाही करावे लागते. जे कर्मचारी ड्यूटीवर हजर असतील त्यांच्याकडून ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडून घ्यावी लागत आहे.
इन्फो...
वीज गेल्यानंतर निर्माण होते अंधाराचे साम्राज्य
वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात इर्न्व्हटर किंवा जनरेटर नाही. त्यामुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. रात्री प्रसूतीसाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर व वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर होणारी गैरसोय प्रसूती वेदनेइतकीच त्रासदायक ठरते.
इन्फो...
आरोग्य केंद्राची वाट खडतर
वावी प्राथमिक आरोग्य केंद्र घोटेवाडी रस्त्याला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे या रस्त्यावर दररोज शेकडो डंपरसह अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह धुळीचे साम्राज्य या रस्त्यावर असते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पायी जातानाही रुग्णांसह नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
इन्फो...
लस वाटपात वावी केंद्रावर अन्याय
सिन्नर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र प्रत्येक आरोग्य केंद्राला लस पुरविताना दुजाभाव होत असल्याचा आरोप माजी सरपंच विजय काटे यांनी केला. याबाबत त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्याकडे तक्रार केली आहे. लसींचे वाटप करतांना वावी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अन्याय करू नये अशी मागणी काटे यांनी केली आहे.
इन्फो...
लसींचे लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप
सिन्नर तालुक्याला मिळणाऱ्या लसींचे लोकसंख्येच्या आधारावर वाटप केले जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. लस वाटपात कोणावरही दुजाभाव केला जात नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तालुक्यात शहरासह १० केंद्रावर लसीकरण करण्यात येते. लोकसंख्येच्या आधारावर लसीचा पुरवठा केला जातो. मात्र तालुक्याला मिळणारी लस कमी असल्याने मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी आहे.