नाशिक : सक्तवसुली संचालनालयाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी काळा पैसा प्रतिबंधक कारवाईअंतर्गत घोरपडे बंधूंना अटक केल्याने सहा वर्षांपूर्वीच्या धान्य घोटाळ्याच्या प्रकरणााला उजाळा मिळाला आहे. विधानसभेत गाजलेल्या या घोरपडेंवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे, तर सात निलंबित तहसीलदार मात्र शासनाच्या चौकशीत दोषमुक्त झाले आहेत.नाशिक जिल्ह्यात २०१५मध्ये हा घोटाळा उघड झाला होता. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात मनमाडमध्ये अन्न महामंडळाचे गुदाम असून, तेथे येणारा माल नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील रेशन गुदामांमध्ये पोहोचविण्यासाठी वाहतूक ठेकेदार म्हणून घोरपडे काम करीत होते. मनमाड येथील या गुदामामधील काही अधिकारी आणि हमालांना हाताशी धरून आलेल्या धान्य पोत्यांतील माल गायब करण्याचे काम ही मंडळी करीत होती. त्यामुळे रेशन दुकानांसाठी बांधलेल्या तालुक्यांच्या स्तरावरील गुदामांमध्ये माल पोहोचत नव्हता. मात्र त्यानंतरही सारे आलबेल सुरू होते. राज्य शासनाच्या एका पथकाने सुरगाणा येथे अचानक गुदामाला भेट दिली तेव्हा तेथील गुदामात ३० हजार क्विंटल धान्य कागदोपत्री दिसत होेते; परंतु प्रत्यक्षात तेथे उंदीर फिरतहोते. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर एकेक कंगोरे उलगडतगेले.नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणचे धान्य गुदामात आलेला माल तपासण्यासाठी जबाबदारी वेगवेगळ्या तालुक्यातील तहसीलदारांवर होती. त्यामुळे खरी माहिती कळेल अशी शासनाची व्यवस्था होती. परंतु प्रत्यक्षात हे तहसीलदार गुदाम तपासणीसाठी कधीच जात नव्हते असे आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. याच काळात सिन्नर येथील गुदामामधील धान्य वाडीवऱ्हे येथे घोटी-सिन्नरमार्गे नेत असताना पोलिसांनी एक टेम्पो पकडला. हा टेम्पो घोरपडे यांच्या मालकीचा असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी मग अधिक खोलाने कारवाई सुरू केली. त्यानंतर राज्य विधिमंडळात हा विषय गाजला. त्यावेळी घान्य माफियांवर मोक्का लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार कारवाईदेखील झाली आहे.
३० हजार क्विंटल धान्य घोटाळा : ईडीने नाशकात केलेली कारवाई घोटाळ्यामुळे उघडकीस आले घोरपडे बंधूंचे प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 1:34 AM