नाशिक /पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे न देता गंडा घालणाऱ्या आडतदार, व्यापारी दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आडतदार, व्यापारी असलेल्या पती-पत्नीने जवळपास ३५ शेतकऱ्यांकडून टोमॅटोचा माल खरेदी केला, मात्र त्या बदल्यात कोणतीही रक्कम न देता तब्बल ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी रवींद्र बद्रीनाथ तुपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आडतदार पुष्पा विलास शिंदे व विलास बाबुराव शिंदे (रा. दिंडोरी रोड) या दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ढेमसे यांच्यासह इतर ३५ शेतकऱ्यांनी (दि.१ ते २३) जुलै या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचा माल विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी संशयित शिंदे दाम्पत्याने लिलाव पद्धतीने टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना सुमारे ३१ लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी पाच दहा नव्हे तर तब्बल ३५ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गंडा घातल्याने बाजार समितीच्या आवारात एकच खळबळ उडाली आहे. बाजार समितीने संशयित शिंदे दाम्पत्याचे परवानेही रद्द केले आहेत.
संशयितांचे गाळे केले जप्त
बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे पैसे शेतकऱ्यांना न देता लुबाडणूक केल्याने बाजार समितीकडून कारवाई करण्यात आली आहे. शिंदे दाम्पत्याविरुद्ध बाजार समितीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच त्यांचे गाळे जप्त करून आठ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.