नाशिक : शहरातील महापालिकेच्या उद्यानांमध्ये दररोज होणाऱ्या हरित कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्यान विभागामार्फत सद्यस्थितीत ३१ उद्यानांमध्ये गांडूळ खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील ९० ठिकाणी गांडूळ खतनिर्मितीची व्यवस्था उभारण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये रोज होणाऱ्या हरित कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न होता. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत पुढाकार घेत उद्यानांमध्ये गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आणि प्रायोगिक तत्त्वावर पंचवटीतील रासबिहारी लिंकरोडवरील प्रमोद महाजन उद्यानात त्याची पहिल्यांदा सुरुवात झाली. उद्यानात तयार होणाऱ्या हरित कचऱ्यावर तेथेच प्रक्रिया करून गांडूळ खतांची निर्मिती करायची आणि त्याच खताचा वापर उद्यानातील वृक्षराजी फुलविण्यासाठी करायचा, हा त्यामागचा हेतू आहे. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर ९० उद्यानांची निवड करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून काही उद्यानांमध्ये गांडूळ खतनिर्मितीसाठी बेड उभारण्याचे काम सुरू होते. त्यानुसार, ४० ठिकाणी बेड तयार करण्यात आले असून, ३१ ठिकाणी गांडूळ खताची निर्मितीप्रक्रिया सुरूही करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, एका प्रकल्पासाठी वार्षिक सुमारे २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पश्चिम विभागातील शिवाजी उद्यानात सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी करत काही सूचना केल्या. यावेळी उद्यान अधीक्षक महेश तिवारी यांनी प्रकल्पांची माहिती दिली. सदर प्रकल्प हे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील सार्वजनिक उद्याने व खासगी हरित पट्टे निवासी क्षेत्रातही राबविण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. (प्रतिनिधी)
३१ उद्यानांमध्ये गांडूळ खताची निर्मिती
By admin | Published: January 22, 2017 12:13 AM