नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांपैकी शुक्रवारी (दि.१०) दुपारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास एकूण ३१ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. त्यातील २५ नमुने हे नाशिक महानगरातील, तर ६ नमुने हे मालेगावचे असून, सर्व निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव काहीसा भांड्यात पडला आहे.
नाशिक जिल्ह्यातून तपासणीसाठी गेलेल्या नमुन्यांपैकी आतापर्यंत तब्बल १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही केवळ बुधवार आणि गुरुवार या लागोपाठच्या केवळ दोन दिवसांमध्ये दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने सर्व प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कमालीची चिंतातुर बनली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात नवीन संशयित दाखल होण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. मालेगावला तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ४०० पथके तयार करून सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतरच संपूर्ण मालेगावबाबतचे वास्तव समजू शकणार आहे.दरम्यान, मालेगावमध्ये घरोघरी फिरून सर्वेक्षण करणाऱ्या पथकांतील कर्मचाऱ्यांसाठीदेखील जिल्हाधिकाºयांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार जे नागरिक या सर्वेक्षणात सहभागी आहेत, त्यांनी स्वत: सर्व प्रकारची स्वसुरक्षेची दक्षता घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक व्यक्तीने मास्क घालूनच प्रवेश करावा. तसेच ज्यांना क्वारंटाइन करायचे असेल त्यांच्यासाठी योग्य प्रकारचे मंगल कार्यालय किंवा हॉटेलची निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्या क्षेत्रात कुणीही मास्कविना फिरताना आढळल्यास त्याच्यावर भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. संबंधित सर्व पथकांतील व्यक्तींना त्याबाबतचे निर्देश देण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.बाधितांच्या निकटवर्तीयांचे नमुनेजिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने मालेगावातील ९ बाधित व्यक्ती आणि चांदवडच्या एका बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचे नमुने घेऊन ते तातडीने पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. त्यामुळे या बाधितांच्या कुटुंबीयांचे अहवाल कसे येतात, त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे.चांदवड, देवळ्यातही मास्क बंधनकारकनाशिकमध्ये मालेगावबरोबरच चांदवड तालुक्यातही कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने चांदवड-देवळा तालुक्यांमध्येदेखील आता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी जाहीर केले आहे. तसेच चांदवडमधील वॉर्ड क्र.३ मधील आदर्शनगरच्या आसपासचा ३ किमी परिघाचे क्षेत्र हे सील करण्यात आले आहे, तर त्या केंद्राच्या परिघातील पाच किमीचा परिसर बफर झोन घोषित करण्यात येत असल्याचेही मिसाळ यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.