नाशिक : एकीकडे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत नाही तोच अन्य आजार डोके वर काढत असून, नाशिक शहरातच डेंग्यूचे तब्बल ३१८ रुग्ण झाले आहेत. महापालिकेत मात्र पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचा घोळ सुरूच असून, टक्केवारीमुळे हा साराच मामला सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात गेल्यावर्षी १ हजार १२४ डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या कमी असली तरी गेल्यावर्षी डिसेंबरपर्यंत महापालिकेची दमछाक झाली होती. यंदा कोराेनानंतर पावसाळा आल्यानंतर तो संपलाही असे वाटत असतानाच पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्ण अधिक आढळले आहेत. जानेवरी महिन्यात ४४, फेब्रुवारी महिन्यात ११, मार्च मध्ये ६, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३, जुलैत १४, ऑगस्टमध्ये २८, सप्टेंबरमध्ये ३९, ऑक्टोबरमध्ये ५१ रुग्ण आढळले, तर नोव्हेंबरमध्ये तब्बल ८१ रुग्ण आढळले आहेत. चालू महिन्यात म्हणजे ११ डिेसेंबरपर्यंत ३२ असे एकूण ३१८ रुग्ण आढळले आहेत.
नाशिक महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्राेलचा ठेका देण्यात येतो. गेल्यावर्षी या ठेक्याची मुदत संपली असली तरी त्याच ठेकेदाराकडून काम करून घेतले जात असून, त्याच ठेकेदाराकडून काम करून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उड्डाणे सुरू आहेत, मात्र हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्या तुलनेत स्थिती खूपच चांगली असून, यंदा जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ५६ रुग्ण आढळले आहेत. त्यावर जिल्हा परिषद आणि नगरपालिका लक्ष ठेवून आहे, असे सांगण्यात आले.
-------------------------
खासगी रुग्णालयांतून डेंग्यू रुग्णांची आकडेवारीच नाही
डेंग्यूसारख्या सर्वच आजारांची माहिती तत्काळ महापालिकेला कळवणे बंधनकारक असले तरी शहरात तसे होत नाही. फार कमी प्रमाणात रुग्णालये माहिती कळवतात. त्यामुळे महापालिका क्षेत्रात सध्या आढळलेले ३१८ रुग्ण ही आकडेवारी तरी खरी आहे काय, याविषयी शंका आहे.
----------------
यंदा पावसाळ्यात डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी नोव्हेंबरमध्ये वाढली आहे. पाऊस झाल्यानंतर कंटेनर आणि अन्यत्र पाणी साचत असल्याने रुग्ण वाढले आहेत; परंतु त्यावर कार्यवाही सुरू आहे.
- डाॅ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्रज्ञ, महापालिका