नाशिक: मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार उर्वरित मदतीची रक्कम जिल्ह्याला मिळाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहेत.
मागील वर्षी लहरी निसर्गाचा फटका जिल्ह्याला बसला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंता व्यक्त केली जात असतांनाच ऑगस्ट-सप्टेबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. शेतातील उभे पिके आडवी झाली, तर काढणीच्या पिकांनाही फटका बसला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचमाने करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १४७ कोटींच्या मदतीचा अहवाल पाठविण्यात आला होता. नुकसानग्रस्त एकूण ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी आता प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साधारणत: अडीच तीन महिन्यांपूर्वी मदतीच्या पहिल्या टप्प्यातील १२० कोटींचा निधी जिल्हाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना आता मदतीचे वाटप केले जाणार आहे.
--इन्फो -
तालुकानिहाय मदत
येवला तालुक्याला १५ कोटी २४ लक्ष, नांदगाव तालुक्याला १५ कोटी ७४ लक्ष, देवळा तालुक्याला ८३ हजार, सुरगाणा तालुक्याला ४ लक्ष ५६ हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ९५ हजार, इगतपुरी तालुक्याला ३ लक्ष १७ हजार, पेठ तालुक्याला ३ लक्ष ७१ हजार तर निफाड तालुक्याला १ कोटी १७ लक्ष रुपये, असा एकूण नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लक्ष निधी प्राप्त झाला आहे.