नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. अर्थात, गतमहिन्याच्या तुलनेत डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची संख्या घटत आहे. चालू महिन्यात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहे. वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या घटत असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूसह अन्य आजाराने सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यापर्यंत दाखल रुग्णांची संख्या वाढत असताना यंदाच्या महिन्यात काही प्रमाणात रुग्ण संख्येत घट झाली आहे. १ ते २६ आॅक्टोबर महिन्यात ७८ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर महापालिका हद्दीबाहेरील ९२ रुग्ण असून, एकूण १७० रुग्ण आढळले आहेत त्यातील ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आठ महापालिका हद्दीतील आहेत. गत महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात रुग्णांचा बळी गेला होता. जानेवारीपासून आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे ४२४ रुग्ण आढळले असून, त्यात मनपा हद्दीतील २३३, तर ग्रामीण १९१ रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत ६३ जणांचा बळी गेला असून, त्यात महापालिका हद्दीतील २३ तर हद्दीबाहेरील ४० जणांचा समावेश आहे. कथडा येथील नऊ महिन्याच्या बालकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रशासन अद्याप ते खात्रिशीर सांगत नसून संबंधित रुग्णाबाबतचे कागदपत्र मागविण्यात आले आहे. सदरच्या बालकाला तीन रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महापालिका प्रत्येक ठिकाणी केलेल्या उपचारांची माहिती मागवित असल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.आॅक्टोबर महिन्याच्या १ ते २६ तारखेपर्यंत ४५१ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, ९७ जणांना अधिकृतरीत्या डेंग्यू झाल्याचे तपासणीत आढळले आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत २ हजार ३०४ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहे, तर त्यातील ६२० जणांना डेंग्यू झाल्याचे अधिकृतरीत्या आढळले आहे. डेंग्यूमुळे आत्तापर्यंत एकाच रुग्णाचा बळी गेल्याचेदेखील महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
नाशकात आॅक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:17 AM