लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथील शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे ३२ पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या असून, ५० पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळ वर्गात चिंतेचे वातावरण असून, या रोगाची लागण इतर मेंढ्यांना व कळपाला होऊ नये म्हणून मेंढपाळांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील संजय झाडे व अभिमन झाडे यांच्या मालकीच्या १५० मेंढ्या असून, देवळा तालुक्यात खालप शिवारात त्यांचे वाडे बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या मेंढ्यांवर अज्ञात रोगाने आक्र मण केल्याने चालत्या-फिरत्या मेंढ्या रोगग्रस्त होत मरण पावत आहे. आतापर्यंत ३२ मेंढ्या या रोगाची शिकार होत मृत्युमुखी पडल्या असून, इतर ५० पेक्षा अधिक या रोगाने क्षतिग्रस्त आहेत. पशुवैद्यकांनी तपासणी करत मेंढ्यांवर उपचार केले, पण या रोगाचे निदान सापडले नाही. यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पशुवैद्यक भाऊसाहेब वाणले यांनी सांगितले. सध्या दुष्काळी स्थिती असून, अद्याप पाहिजे तसा मोठा पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची वानवाच आहे. त्यात असे नुकसान झाल्याने झाडे कुटुंबीय निराशेच्या गर्तेत सापडले आहे. या मृत मेंढ्यांचा तातडीने पंचनामा करून या मेंढपाळांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी धनगर वर्गाने व शेतकऱ्यांनी केली आहे.
खालपला अज्ञात रोगाने ३२ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:44 AM