नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुकांची मनधरणी करताना राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना अक्षरश: नाकीनव आले. सदस्यांचे सभागृहातून पलायन तर काहींना माघारीसाठी दबाव आल्याने अधिकाºयांसमक्षच रडू कोसळले. अखेर राजकीय सहमती मिळवत ४० पैकी ३३ जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा नियोजन समितीतून माघारीसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत असल्याने सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी हजेरी लावल्याने राजकीय गप्पांचे फड रंगतानाच, राजकीय सहमतीसाठी विविध पातळीवर प्रयत्नही सुरू होते. माघारीसाठी सदस्यांची मनधरणी, तर कुठे पक्षाचा धाक दाखविण्यात येत होता. काही उमेदवारांना तातडीने पाचारण करण्यात आले, तर काहींनी भ्रमणध्वनी स्विच आॅफ करून गुंगाराही दिला. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणाºया या राजकीय नाट्यात अखेर जिल्हा परिषदेच्या गटातील २३ जागांवर सहमती झाल्याने अन्य उमेदवारांनी माघार घेतली. तर महापालिका गटातील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गट, सर्वसाधारण गटात एकमत न होऊ शकल्याने निवडणूक अटळ झाली. सर्वसाधारण महिला गटातून दीपाली कुलकर्णी, संगीता गायकवाड, सुषमा पगारे, शेख ताहेरा शेख रशिद या चौघांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांपैकी ३३ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सात जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची पद्धत पसंतीक्रमाने असून, सोमवारी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. लहान नागरी गट म्हणजेच नगरपंचायत गटातील एका जागेसाठी १०२ सदस्य मतदानाचा हक्क बजावतील, तर महापालिका गटासाठी नाशिक व मालेगावचे २०६ सदस्य मतदानात भाग घेतील. जिल्हा परिषदेच्या बागलाणच्या एका महिला सदस्याची अखेरपर्यंत उमेदवारी करण्याचे प्रयत्न सुरू होते. ती स्वत: व तिचे पतीही याकामी ठाम होते. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे सांगून, पक्षाने आजवर कसा अन्याय केला, आता तरी न्याय मिळावा असे तिचे म्हणणे होते. परंतु अखेर पदाधिकाºयांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली व माघारीचा अर्ज भरतांना महिला सदस्य हमसून हमसून रडली.
जिल्हा नियोजन समितीच्या ३३ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:13 AM