नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने वर्षभरातील आतापर्यंतचा उच्चांकी ३३३८ रुग्णांचा टप्पा गाठला असून, एकाच दिवसात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हादरली आहे. गत आठ दिवसांमध्ये मिळून रुग्णसंख्येने तब्बल १८ हजारांवर रुग्ण बाधित आढळले आहेत.
बुधवारी (दि. २४) गेलेल्या १५ बळींमुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या २२६२वर पोहोचली आहे. कोराेनाने गत बुधवारपासून सलग सात दिवस दोन हजारावर रुग्णांना गाठले असून, बुधवारच्या आठव्या दिवशी बाधित संख्येने तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडत सर्व यंत्रणेला धक्का दिला आहे. त्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे सरासरी प्रमाणदेखील ८६.८८ टक्क्यांवर आले असून, मृत्युदरातही वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातदेखील प्रथमच १८४९ इतका बाधितांचा आकडा गाठला जाणेदेखील उच्चांक ठरला आहे, तर शहरात दहा बळी जाण्याची घटनादेखील सप्टेंबर महिन्यानंतर प्रथमच घडली आहे. त्यामुळे नाशिक शहर हा कोरोनाबाधितांचा आणि बळींचादेखील हॉटस्पॉट ठरू लागला आहे. प्रलंबित अहवालसंख्यादेखील तब्बल पाच हजारांवर असल्याने आठवडाभर अजून मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित आढळण्याची चिन्हे आहेत. कोरोना रुग्ण आणि बळींचा हा विस्फोट नाशिककर आणि प्रशासनाच्या दृष्टीने मोठ्या चिंतेचा विषय ठरला आहे.