श्याम बागुल, नाशिक : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर अपघाताला आमंत्रण देणाऱ्या ब्लॅकस्पॉटवर अपघात रोखण्यासाठी महापािलकेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जाणार असून, अशा सुमारे ३३७ ब्लॅकस्पॉटवर कामे करण्यासाठी बांधकाम खात्याने प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रियेचे काम सुरू केले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिर्ची चौकात खासगी प्रवासी वाहतूक बस व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन १३ प्रवासी जागीच ठार झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणांवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेबराेबरच प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पाेलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात शहरात ३३७ ब्लॅक स्पाॅट आढळून आले आहेत.