नाशिक : शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढतच असून, गेल्या दोन दिवसांत ३४ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून, त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूच्या एडीस डासाच्या अळ्यांची शोधमोहीम सुरूच असून, ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेवरही भर दिला जात असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.शहरात यंदा प्रथमच डेंग्यूने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत शहरात १०५३ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ९२५ रुग्णांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून, एकूण ४४४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये महापालिका हद्दीत ३४९, तर महापालिका हद्दीबाहेरील ग्रामीण भागात ९५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांत ३४ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून, त्यांचे रक्तनमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असून, त्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण येण्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. डेंग्यूने पसरलेले हातपाय पाहता पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात विविध प्रभागांमध्ये पथके निर्माण करून डेंग्यूच्या एडीस डासाच्या अळ्यांची शोधमोहीम जारी ठेवली आहे. याशिवाय नागरिकांमध्ये जागृतीही केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे यांनी दिली. (प्रतिनिधी)
शहरात दोन दिवसांत आढळले ३४ डेंग्यूसदृश रुग्ण
By admin | Published: December 04, 2014 12:28 AM