गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने पशुपालकावर मोठे संकट ओढावले आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुळवंच येथील धनराज वाळीबा सानप यांची शेतजमिन एमआयडीसीच्या प्रकल्पात गेली आहे. त्यानंतर ते पशुपालनाचा व्यवसाय करु लागले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी शेळ्यांची खरेदी केली होती. सानप यांच्याकडे शेतजमिन नसल्याने ते भाऊसाहेब रामनाथ सानप यांची शेतजमिन वाट्याने करण्यासह शेळीपालनाचा व्यवसाय करीत होते. बारागावपिंप्री रस्त्यावर गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीत झापात सानप यांनी रात्रीच्यावेळी शेळ्या कोंडलेल्या होत्या. धनराज सानप शेळ्या झापात कोंडून जवळच बाहेर झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सानप जागे झाले. यावेळी ६ ते ७ लांडगे झापात शिरले होते. दरवाजा उघडल्याने काही शेळ्या जीवाच्या आकांताने सैरवर पळू लागल्या होत्या. लांडग्यांच्या हल्ल्यामुळे काही शेळ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला तर काही शेळ्या व बकरांचा लांडग्यांनी फडशा पाडला. सानप एकटेच होते, त्यांनी लांडग्यांचा हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र लांडग्यांनी त्यांना जुमानले नाही. सानप घरात गेले व मोबाइलहून परिसरातील शेतकऱ्यांना फोन करुन मदतीसाठी बोलावून घेतले. तोपर्यंत ६ ते ७ लांडग्यांच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी उजेडल्यानंतर परिसरात १४ मृत शेळ्या तर २ अत्यवस्थ शेळ्या आढळून आल्या. इतर शेळ्या व बकरांचा लांडग्यांनी फडशा पाडल्याचे सांगण्यात येते.
लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 3:23 PM